Monday, 8 August 2016

श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांचा वाढदिवस!

श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांचा आज वाढदिवस!
         आज त्यांनी आपल्या वयाची ९५ वर्ष पूर्ण केली....अं हं स्वतःसाठी
नाहीच.... तर जे वेड आहे जो ध्यास घेतला आहे त्यासाठीच निम्मं आयुष्य वेचलं!
माणसं एखाद्या ध्येयासाठी कशी जगू शकतात त्याच उदाहरण म्हणजे श्रीमंत
बाबासाहेब आणि आमचे श्रीयुत भिडे गुरुजी....!
          संन्यस्त व्रतस्थ ए है....हे शब्दच अपुरे पडतील अशी ही दोन्ही
व्यक्तिमत्त्व....दोघांतील समान धागा 'शिवछत्रपती' जाणता  राजा..अन त्याचा
प्रसार-प्रचार इतिहासात जगून-वागून इतरांना प्रेरित करण्याचा....!
            पैकी बाबासाहेबांचं व्यक्तिमत्त्व हरहुन्नरी त्यांच्या अनेकविध
पैलू मुळे आजही तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेले श्रीमंत...!
             फक्त महाराष्ट्रभूषणच नव्हे भारतालाही भूषण ठरलेले श्रीमंत
पुरंदरे..!
               स्फूर्ती-प्रेरणा-प्रसन्नता यांचा त्रिवेणी संगमच जणू
पुरंदरेंच्या रुपात आम्ही अनुभवतोय असं म्हणणेही अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
               तसा माझा आणि श्रीयुत पुरंदरेंचा संबंध फक्त पुस्तकातूनच पण सन
२००३मध्ये डी एड साठी वारणा कोडोली (ता.पन्हाळा)येथे असताना त्यांच्या
व्याख्यानाला जाण्याचा योग आला.व्याख्यान होतं 'सर्वोदय'च्या दुसऱ्या मजल्यावर
आणि त्यावेळी खेड्यात इतक्या काही सोयी-सुविधा नव्हत्या.त्यामुळे
उद्वाहक(लिफ्ट)सुद्धा नाही.वयपरत्वे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना जिना
चढणेही अवघड होते.त्यांना सोडण्यासाठी आलेली गाडी पुढे निघून गेली.जवळ अन्य
कोणीच नव्हते आणि संयोजक कार्यकर्ते बाहेर नसल्याने स्वागताला हि सर्व मंडळी
वरच्या मजल्यावर वाट पाहत होती.गाडीतून उतरतानाच त्यांची अवस्था पाहून मीच
लगबगीने पुढे झालो आणि त्यांना जिना चढण्यासाठी खांद्याचा आधार देऊन
व्यासपिठापर्यंत पोहोचवलं.वर त्यांच्यासोबत आलेलं पाहून अनेक श्रोत्यांच्या
आदरार्थी नजरासुद्धा मला माना वळून पाहू लागल्या.मी थोडा वरमलो आणि त्याच वेळी
मनात आलं की २/३मिनिटांच्या बाबासाहेबांच्या सान्निध्यामुळे इतका आदर आणि
उत्सुक नजरा आपल्याकडे वळल्या तर त्यांच्या विचारांच्या पुस्तकांचा चाहता-भक्त
झालो तर याच नजरा तशाच आदरानं कायम राहतील....!एक आदर्श जीवन निर्माण होईल....!
              हि ताकद माणसाच्या अभ्यासातून,व्रतस्थ वृत्तीतून येते
इतकंच..अशा ताकदीचे माझे प्रेरणास्थान असलेले श्रीमंत पुरंदरे!तो त्यांचा
२/३मिनिटांचा खांद्यावरचा 'भार' मला आयुष्यभर 'शिदोरी' देणाराच ठरतोय...!
                     या व्याख्यानावेळी त्यांच्या विनोद बुद्धीची चुणूक
अनुभवायला मिळाली;ती अशी....कार्यक्रमावेळी स्वागत सत्कार झाले फेटा बांधायला
उशीर झाला अन विलंबानेच त्यांना बोलायला संधी मिळाली.त्यांनी त्यावेळी सुरवातच
करताना म्हटले,असो,फेटा वगैरे बांधला ठीक आहे,पण तो आता काढून बाजूला
ठेवतो(पांढऱ्या विरळ केसांवर हात फिरवत हळू आवाजात) कारण:माझी हेअर स्टाइल
बिघडेल ना..?..!!हे ऐकताच धीर गंभीर जन समुदायातून हास्याची लकेर पसरली आणि
पुढे मग सांगायला नकोच,साक्षात शब्दातून शिव दरबारच भरवला गेला....!
             श्रीयुत भिडे गुरुजींनी संस्थापिलेल्या श्री शिवप्रतिष्ठान
हिंदुस्थानचा हरेक धारकरी त्यांच्या नित्य नियमनामध्ये दररोज श्रीमंतांच्या
लेखणीतून अवतरलेले श्री शिवचरित्र किमान पंधरा मिनिटं वाचल्याशिवाय कोणत्याही
कामाला सुरवातच करत नाही.तसाच मी एक धारकरी....शिवभक्त....!
               त्यांच्या लेखनाचं कौतुक मी करणे म्हणजे साक्षात सूर्याचं
वर्णन काजव्यांने,मोत्याचं कौतुक दवबिंदूने,सागराच्या अथांगतेच कौतुक मुंगीने
केल्यासारखेच होईल....!
         गेल्या आठवड्यात चरित्र वाचनाच्या वेळी असाच त्यांच्या लेखनशैलीचा
उत्तुंग अनुभव गवसला.(त्या लेखन पृष्ठाची प्रतिमा सर्व वाचकांसाठी सोबत दिली
आहे.)
                  इतिहासात जगून इतिहासाचं वेड डोक्यात ठेऊन शिवकार्यात झोकून देऊन
शब्दांतून शिवसृष्टी उभी करुन अखिल युवकांना प्रेरणा देऊन जगण्याची नव-संजीवनी
देणाऱ्या भारतभूषण-महाराष्ट्रभूषण अखंड लक्ष्मीअलंकृत श्रीमंत श्रीयुत
बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिनाच्या शुभेच्छा...आपल्याला उदंड -आरोग्यदायी
आयुष्य लाभो..! एव्हडच श्री जगतजननी माता तुळजाभवानी समोर मागणं अन त्यांच्या
लेखणीला मानाचा त्रिवार मुजरा...!
इति लेखनसीमा।
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय..!
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय...!
भारत माता कि जय...!


✍ श्री विशाल आनंदराव हारगुले
श्रावण शुद्ध ।।पंचमी।।शिवसंवत-३४३
दि.०७/०८/२०१६-रविवार

ता.क.-सन २००३च्या सुमारास भ्रमणध्वनी नसल्याने प्रतिमा वा अन्य काहीच आठवणी
ठेवता आल्या नाहीत.फक्त याचि देही याचि डोळा...!धन्यवाद..!

 

No comments:

Post a Comment