Thursday, 12 October 2017

नाद_खुळा_फक्त_जिल्हा_परिषद_शाळा...!! हादगा
                          हस्त नक्षत्र संपले आणि सोमवारी(दि.०९रोजी) आमच्या शाळेचा हादगा बोळवला...... म्हणजे विसर्जित केला.त्यावेळी मिष्टान्न अर्थात स्नेहभोजनाचा(माध्यान्ह भोजनातील एक उपक्रम) कार्यक्रम उरकण्यात आला.शिरा-पुरी-मिसळभाजी-पापड-लोणचे-भात-आमटी असा यथेच्छ भोजनाचा बेत होता.
                     दुपारी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला नि सायं. 4 च्या सुमारास ओढ्यामधील वाहत्या पाण्यात हादगा विसर्जित केला.
                   




पंधरा एक दिवसातील हादगा उपक्रमातील असंख्य शैक्षणिक मूल्य.....नक्की वाचा आणि प्रतिक्रिया द्या..सुधारणा सांगा....नक्की बदल करु..!🙏
🎶ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडिला करिन तुझी सेवा..!
🎶आड बाई आडोनी आडाचं पाणी काढोनी...!
गत महिन्यात हस्त नक्षत्रावर स्थापित झालेला हादगा तथा भोंडला...!
विद्या मंदिर,मरळे (शाहूवाडी) येथील चिमुकल्या मुलींनी सुद्धा अतिशय मनापासून हा हादगा बसविला. दररोजहार-फुले यांचे नियोजन गटानुसार करण्यात आले होते.साडेचार वाजले की हादग्याची पूर्वतयारी आणि सुमारे अर्धा तास या कलाकार मुली अगदी फेर धरून नाच करायच्या आणि हादगा साजरा करायच्या.सोबत ग्रामीण ढंगातील गाण्यांच्या सुरावटीने काही औरच वातावरण तयार व्हायचे.या सुरावटीने ग्रामस्थांचे पाय हि काही काळ शाळेजवळ थबकायचे; मुलींची हि कलाकारी पाहून खुश होऊन जायचे.
सर्वात शेवटी खिरापत आणि ती ओळखण्याची चढाओढ...ए है.....दिवसभराच्या आनंदाला अगदी उधाण यायचं.कधी अंदाजे,कधी वासावरून,कधी आवाजावरून कधी तर्क.....नाही...नाही...!नाही....अं....नाही....!!अहं...नाहीच ओळखली...!....आमचा गट नाद खुळा आहे...नाहीच ओळखणार आमची खिरापत.....!अशा हास्य-गोंधळ-शाब्दिक कोट्या करत शेवटी खिरापतीचा पदार्थ सांगितला जायचा...!
रांगेत बसून वाटप त्याचा आस्वाद घेत उद्याच्या गटाचे नाव पुकारले जायचे....अन यासरशी शाळेची घंटा सुद्धा वेळ झाल्याचे विसरुन जायची मग उद्याच्या तयारीच्या बोलाचालीतच चिमुकल्यांची आनंदलेली पावले हळू हळू घराकडे वळायची...!
काय नाही शिकलो...?..यातून क्षणभर अभ्यासक्रमाचे गाभा घटक पाहिले तर अगदी सर्वच घटक अशा छोट्या वाटणाऱ्या पण बहुत शिकवून जाणाऱ्या हादग्यातून शिकल्याची प्रचितीच व्हायची.बघू या काही घटक...!
संघटन-गटकार्य.
खिलाडू वृत्ती.
व्यवस्थापन(नियोजन/पूर्वतयारी)
स्त्री पुरुष समानता(खिरापतीची तयारी)
लोकगीतांचा जागर.
संस्कृती-ग्रामीण रिवाजाची ओळख
पारंपरिक कलागुणांना वाव
शारीरिक शिक्षण-सर्वांग सुंदर हालचाली
कला-गीतगायन,नृत्य
कार्यानुभव-हार बनविणे,रांगोळी रचना आदी
गीतांमधून बेटी बचाओ चा जागर
ऐतिहासिक घटनांचा गीतांमधून उल्लेख
(शिवाजी अमुचा राजा त्याचा तो चाकण किल्ला)
आपसूकच हसत खेळत शिक्षण
बौद्धिक विकास-गीत पाठांतर
विज्ञान विषयाशी संबंधित-विविध खाद्य पदार्थ,पाककला,जीवनसत्त्वे घटक यांची ओळख.
मुलींसाठी आनंद लुटण्यासाठी मुक्तद्वार म्हणजे भोंडला.
पर्यावरण-विविध फुले पाने आणि ऋतू-नक्षत्र बदल याची माहिती.
भागातील फुला-फळांची माहिती.
आदी आदी आदी......
आणखी किती शैक्षणिक बाबींशी सहसंबंध जोडता येईल.
खाजगी बेगडी इंग्रजाळलेल्या शाळेतील कृत्रिम इव्हेंट साठी पैसे खर्चून फोटो सेशन करण्यापेक्षा हा जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व मूल्यांचा जागर करणारा हादगा आपलासा वाटतो ना..?
शेवटी काय निखळ आनंद आणि त्यातून माणूस बनवण्याचं शिक्षण हेच खरं शिक्षण....!
बरोबर ना...!काय वाटत याबाबत आपल्याला...व्यक्त व्हाल..?
म्हणूनच...
#नाद_खुळा_फक्त_जिल्हा_परिषद_शाळा..!
■विशेष सहाय्य-श्री भरतसिंह वळवी(मुख्याध्यापक)
■सोबत प्रतिमा-हादग्याचे काही प्रसंग-आनंदक्षण, गोलाविष्कार,खिरापत-स्नेहभोजन वाटप,इत्यादी
जयहिंद🇮🇳
वंदे मातरम🇮🇳
भारतमाता की जय..!🇮🇳
 श्री विशाल आनंदराव हारगुले
अध्यापक,विद्या मंदिर,मरळे.(ता.-शाहूवाडी)

Wednesday, 8 March 2017

#चला_खेड्याकडे...#शुभ_संध्या....#शुभ_सांज...

#चला_खेड्याकडे...#शुभ_संध्या....#शुभ_सांज...

शेतामधलं घर म्हणजे अगदी पूर्णतः निसर्ग सान्निध्यच..!
जिकडं नजर टाकेल तिकडं डोळ्यांना सुखावणारं दृश्य...
मस्त वातावरण अन त्यामुळे झालेलं प्रफुल्लित मन...!
त्यात जर तिन्ही सांजेची वेळ असेल तर काय..?
गाई-म्हैशीचं हंबरणं....धार काढताना चरवीमधून येणारा चर्र्रर्रर्र चर्र्रर्रर्र आवाज....बछडा-वासरांचा अवखळ नाच...कोंबड्यांची झरझर करत पाय उकरत खुराड्यातील माघारीसाठी पळापळ....कुत्र्याची पायातील घुटमळ... मनी म्याऊंची पायाला लगट...अन झापातील चुलीवर टम्म फुगलेल्या भाकऱ्यांचा खरपुस वास तर दुसऱ्या चुलवाण्यावर रटरटणारं कोरड्यास(कालवण/भाजी)...सोबत धुरांच्या रेषांनी डोळ्यांत येणाऱ्या धुराश्रुंच्या रेषा...अप्रतिम...शब्द...संपले..!
कोंबड्यापासून गाईपर्यंत...
गाजरापासून वांग्यापर्यंत...
कणसापासून हरभऱ्यापर्यंत...
कडीपत्यापासून गवती चहापर्यंत...
काय सांगू नि काय नको...!
अशा अवर्णनीय वातावरणात आजची सांज...
ए है....मस्तच...!आता खरं उमजलं महात्मा गांधी खेड्याकडे जाण्याचा संदेश का देत होते...?
मी तर रंगून गेलो....आणि मग आनंद वाटून द्विगुणित होतो ना...?..म्हणून...मग काही छायाचित्रे तुम्हां सर्वांसाठी...
माझ्या सर्व स्नेह्यांना तिन्हीसांजेच्या मनस्वी शुभेच्छा..!
#शुभ_सांज..!
विशेष आभार:श्री दळवी बंधू.(साळवाडी,ता.पन्हाळा)
ता.क.:अगदी अर्ध्या तासात इतका मोठ्ठा आनंदानुभव..!
इति लेखनसीमा...!🙏🤓🙏
जयहिंद..!🇮🇳
वंदे मातरम..!🇮🇳
भारतमाता की जय..!🇮🇳
✒ श्री विशाल आनंदराव हारगुले.
दि.०५/०३/२०१७-रविवार


                                                                                   

Sunday, 15 January 2017

चिमुकल्या विराजचा प्रश्नांचा भडिमार...







पत्रकार दिनाचा कार्यक्रम आटोपून घरी आल्यानंतर चिमुकल्या विराजचा प्रश्नांचा भडिमार...
आज शाळेला का नाही गेला..?
आज काय होतं?
मग तुमच्या डोक्यावर फेटा का बांधला...?
साऱ्या प्रश्नांची उत्तरं न देता;त्याच्या डोक्यावर फेटा घातला अन काय..??
तो फेटा मिरवतच,सारे प्रश्न बाजूला ठेऊन (नव्हे विसरुन!)त्याने फोटो सेशनसाठी असा हट्ट धरला....!
पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघाचा भरगच्च विधायक पुरस्कारांसह त्यांचे मानपत्र लेखन आणि सूत्र संचालन असे आजचे दोन्ही अनुभव खूपच मौलिक....आनंददायी...!
Arun Talekar
Dhanaji Gurav Dhanaji Gurav
धनाजी पाटील Ravi Patil
या पत्रकार बंधूंसह पश्चिम पन्हाळा पत्रकार संघाचे ऋण...
ऋणानुबंध राहावेत अखण्ड...!
पुनःश्च पत्रकार दिनाच्या मनस्वी शुभेच्छा..!
जयहिंद
✒ श्री विशाल आनंदराव हारगुले
दि.०६/०१/२०१७

✒पत्रकार दिन..









✒पत्रकार दिन..
पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने विविध सहा उपविभागातून जे लोक सामाजिक-शैक्षणिक-राष्ट्रीय क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्यरत असतात;पण अशीच मंडळी तितकीच दुर्लक्षलेली आणि प्रसिद्धीपासून दूर असतात...
ग्रामीण भागात पत्रकारिता करत असताना वर्षभरात दृष्टीस पडलेल्या अशा अवलियांना हेरुन विना शिफारस;त्रयस्थ अवलोकन करुन पत्रकार दिनाला अशा अवलियांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.विना शिफारस फक्त त्यांचं निस्वार्थ कार्य पाहून तसेच त्या पुरस्कारामुळे इतरांना प्रेरणा मिळून त्यांनीही समाज वा राष्ट्रकार्यात झोकून द्यावं या अपेक्षेसह सदर पुरस्कार देण्यात येतात;हे पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघाचे विशेष म्हणावे लागेल.
यंदाचा १५ पुरस्कारांचा वितरण सोहळा पत्रकार दिनी बाजारभोगाव(पन्हाळा) येथे पार पडला.या पुरस्कारकर्त्यांना मानाचा फेटा श्रीफळ पुष्प गुच्छ आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी दिलेल्या मानपत्राचे लेखन करण्याची धुरा माझ्याकडे सोपवली होती.मला हे मानपत्र लिहिताना असंख्य विधायक बाबी गवसल्या..त्याच बाबी मानपत्रातून अवतरल्या.उद्यापासून सलग पंधरा दिवस ती मानपत्रे fb वरील माझ्या सर्व स्नेह्यांसाठी देत आहे.अशा चांगुलपणामुळेच समाज टिकून आहे राष्ट्र अखण्ड आहे याची खात्री वाटते.
ता.क.:-सदर वाचनातून अन्य कोणाला प्रेरणा मिळाली तरी सार्थक होईल.या मानपत्रांच्या पोस्टला टॅग करण्याची इच्छा असणाऱ्या स्नेह्यांनी कंमेंट्स मधून कळवावे.दररोज सायंकाळी सात वाजता #मानपत्र_पत्रकारदिन पोस्ट केल्या जातील.
सर्व श्रेय पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघ आणि संयोजक यांचे....!
#मी निमित्तमात्र...!
पत्रकार दिन:काही क्षणचित्रं/कार्यक्रमपत्रिका.
दि.०६/०१/२०१७
जयहिंद
वंदे मातरम..!🇮🇳
✒ श्री विशाल आनंदराव हारगुले